तरच कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

इंदापूर : कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले तरच कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल त्यामुळे नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ आदी उपस्थित होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले, अजूनही शहरात काही मोक्याच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. पोलिस विभाग व इंदापूर नगरपरिषदेने याबाबत ठोस भूमिका घेऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. विशेषतः लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना गर्दीमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. इंदापूर शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात. कोरोना चाचणी व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. रोज 1 हजार चाचण्या होणे आवश्यक आहे.

इंदापूर तालुक्यात लसीची मात्रा पहिली मात्रा ७६ टक्के आणि दुसरी मात्रा ७९ टक्के लोकांनी घेतलेली आहे. वर्धक मात्रा ३२५ लोकांनी घेतलेला आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकानी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.