पुणे / दौंड : महावितरण कंपनी आणि कानगाव येथील शेतकऱ्यांमध्ये सोमवारी मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. याच वादाचे पर्यावसन आता एकदूसऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्यापर्यंत पोहोचले असून जर महावितरण कंपनीने शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करून खोटी केस दाखल केली तर संपूर्ण गावं आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कानगाव ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी लेखी अर्जाद्वारे पोलीस ठाण्यात दिला आहे.
याबाबत रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी माहिती दिली की शेतकऱ्यांची महावितरण कंपनीने अनेक वेळा बेकायदेशीरपणे शेतीपंपाची वीज तोडली होती. आजही त्यांनी हाय होल्ट २२०० असलेल्या मेन लाईन तोडून ओल्या शेतामध्ये टाकून महावितरणचे अधिकारी पळून गेले होते.
शेतकऱ्यांनी त्यांना आणून सन्मानाने कनेक्शन जोडून घेतले हे करत असताना काही शेतकऱ्याकडून रागाच्या भरात बाचाबाची झाली परंतु महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता ५६(१) एक प्रमाणे नोटीस न देता पूर्वसूचना न देता लाईट तोडली होती व आज एवढ्या थंडीमध्ये कानगाव परिसरामध्ये किमान एक हजार महिला कांदा लागणीसाठी पहाटेच शेतावरती जाऊन थांबल्या होत्या. परंतु अचानक लाईट कट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष तयार झाला. हे सर्व झाल्यानंतर कोणतीही अप्रिय घटना झाली नाही. तरीसुद्धा जर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांवर खोट्या केसेस दाखल केल्या तर ग्रामस्थांच्या मार्फत तीव्र आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत यवत पोलीस ठाण्याच्या आवारात महावितरण कर्मचारी व शेकडोच्या संख्येने कानगावचे शेतकरी व ग्रामस्थ जमले होते त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग बनले होते. मात्र यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी योग्यपद्धतीने परिस्थिती हाताळत पुढे उद्भवणाऱ्या गोष्टींचा विचार करून दोन्हीकडील लोकांशी संवाद साधत परिस्थि नियंत्रणात ठेवली आहे.
कानगावच्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी मात्र ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये ठिय्या मांडला असून गुन्हे दाखल झाल्यास आमरण उपोषण करण्याची तयारी सुरू केली आहे.