Ex MLA Pataskar home issue – स्वातंत्र्य सैनिक आणि दिवंगत माजी आमदार पाटसकर यांच्या कुटुंबियांना घर मिळण्याच्या आशा पल्लवित, घराचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना



|सहकारनामा|

पुणे : स्वातंत्र्य सैनिक आणि दौंड चे दिवंगत माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या कुटुंबियांच्या घराचा प्रश्न हा प्राधान्याने मार्गी लावणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज त्यांचे चिरंजीव हरिभाऊ पाटसकर आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांना दिली. यावेळी दौंड चे जेष्ठ पत्रकार रमेश वत्रे हेही उपस्थित होते.

सुमारे 30 वर्षांपूर्वी पाटसकर कुटुंबीयांनी आपली शहराजवळ असणारी सुमारे सात एकर जमीन हि विकासकामांसाठी दिली होती. यावेळी त्यांना घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण न झाल्याने त्यांना भाड्याच्या घरातच रहावे लागत आहे.

याबाबत विविध माध्यमांमधून पाटसकर यांच्या घराबाबत आवाज उठवला गेल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. 

याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिळताच त्यांनी याबाबत वयक्तिक माहिती घेतली होती. आज पुणे शहरातील कौन्सिल हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी हरिभाऊ पाटसकर यांची अजितदादांशी भेट घडवून आणली त्यावेळी पाटसकर यांनी सर्व माहिती अजित पवारांना दिल्यानंतर त्यांनी त्वरित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवत कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना न्याय द्यायचा आहे, मला काहीही माहीत नाही सगळा प्रस्ताव हा पॉझिटिव्ह यायला पाहिजे, कुठलीही त्रुटी त्यामध्ये राहता कामा नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे आता स्वातंत्र्य सैनिक आणि माजी आमदार यांच्या कुटुंबियांना स्वतःचे घर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.