दौंड : वीज वितरण कंपनी( महावितरण) च्या हुकूमशाही कारभारा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे सुरू असलेल्या कदम यांच्या आंदोलनाला शेतकरी वर्गाकडून पाठिंबा मिळत आहे.
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी दाखवून त्यांच्या वीज पंपाचे वीज जोड तोडलेले आहेत, महावितरणच्या या जुलमी आणि मनमानी कारभारा विरोधात आपण अन्नत्याग सत्याग्रह करत असल्याचे राजाभाऊ कदम यांनी सांगितले. शेतकरी महावितरण कंपनीला देणे लागत नसून महावितरण कंपनीच शेतकऱ्यांचे देणे लागत आहे हे कागदोपत्री पुरावे दाखवून सिद्ध केले आहे,शेतकऱ्यांनी जर एकजूट दाखविली तरच त्यांचे विजोड महावितरण कंपनीला जोडावेच लागतील. शेतकरीवर्ग बरबाद झाला आहे त्याने विज बिल भरायचे तरी कसे? पुढाऱ्यांना शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे काही देणे घेणे नाही असे दिसते आहे. गावात पुढारी आले की त्यांच्यासमोर फटाके उडविणारे कार्यकर्ते शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत का बोलत नाही, आता गावामध्ये पुढारी आले तर फटाके उडवायचे का त्यांना आपल्यावरील अन्यायाबाबत जाब विचारावयाचा असा सवालही राजाभाऊ कदम यांनी उपस्थित केला आहे.