दौंड : विद्युत वितरण कंपनीने विज तोडणी तातडीने थांबवावी व तोडलेले विज जोड त्वरित जोडण्यात यावेत अशी मागणी करीत, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनी व राज्यातील आघाडी सरकार विरोधात दौंड मध्ये आंदोलन करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, आघाडी सरकार आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहतोय का असा उद्विग्न सवाल यावेळी शेतकरी बांधवांनी केला. महावितरणच्या हुकूमशाही कार्यपद्धती विरोधात शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. खंडित विज पुरवठा सुरु करा, हप्ते खोरी बंद करा, शेतकरी उध्वस्त तर आघाडी सरकार बरखास्त अशा शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाची सांगता येथील महावितरण कार्यालयासमोर करण्यात आली. या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेमध्ये किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या भूमिकेचे वाभाडे काढले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारी कारवाई तातडीने थांबवावी, आघाडी सरकारने कृषी पंपांची विज तोडून वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी सुद्धा बंद केले आहे असा आरोप आघाडी सरकारवर यावेळी करण्यात आला. वीज वितरण कंपनी व आघाडी सरकार कृषी पंपाचे 76 हजार कोटी रु थकबाकी असल्याचे खोटे सांगत आहे, सरकार नेमके कशाच्या आधारे वीज पुरवठा बंद करीत आहेत असा सवालही किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, कृषी पंपाची तातडीने विज सुरू करावी अन्यथा भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आणखीन उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
किसान मोर्चाचे पदाधिकारी गणेश पाटील आखाडे, माऊली शेळके, माऊली ताकवणे, शिवाजीराव काळे,अशोक फरगडे, शामराव ताकवणे, केशव काळे, तुकाराम अवचर,राजाभाऊ बुऱ्हाडे, वैभव आटोळे, अभिमन्यू गिरमकर, फिरोज खान, नासिर पटेल, मनोज फडतरे, गौरव गाढवे, रवी नाना दोरगे आदि उपस्थित होते.