Daund issue – ताई, काही करा पण आम्हाला ‛ते’ रेशन दुकान नको! दौंड शहरात महिलांनी खा.सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली व्यथा



दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)

ताई “आमच्या तक्रारी असूनही आम्हाला रेशनींग दुकान बदलून दिल जात नाही, आता तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करा आणि अधिकाऱ्यांना सांगा, काहीपण झाले तरी आम्हाला आता ‛त्या’ रेशनींग दुकानातून रेशन घ्यायचच नाही. आम्हाला ‛ते’ रेशनींग दुकान बदलून दुसरे दुकान द्यायला सांगा अशी व्यथा दौंड शहरातील महिलांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर व्यक्त केली. 

यावेळी सुळे यांनी महिलांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्याना लक्ष द्या, अशी सुचना करते व हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करते असे अश्वासन महिलांना दिले. दरम्यान महिलांनी सुळे यांना लेखी निवेदन दिले आहे. 

दौंड शहरात एक रेशनींग दुकान असून त्या लगतच त्या मालकाचे स्वतःचे किराणा दुकान आहे. रेशन दुकानदार वेळेवर रेशनींग दुकान उघडत नाही, कार्डवरील पुर्ण धान्य देत नाही, धान्य असूनही दिले जात नाही, उडवाउडवीची उत्तर दिले जातात, माझी कुणाकडे तक्रार करायची त्याच्याकडे करा काही फरक पडत नाही असे म्हणून तक्रार केल्यास त्याच्याकडे बघून घेतो अशी दमदाटी केली जाते. अश्याच काही कारणांमुळे या दुकानाचे लायसन्स बरेच दिवस रद्द करण्यात आले होते अशी चर्चा असून पुन्हा ‛वशीला’ लावून हे दुकान सुरू करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 

सदर महिलांनी व तक्रारदारांनी हा प्रकार महाराष्ट्र राज्य बहुजन लोक अभियानाचे अध्यक्ष आबा वाघमारे यांना सांगितला. या नंतर वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील  यासंदर्भात पुन्हा शुक्रवारी (दि.८) दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. पाटील यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान संतप्त महिलांनी तहसीलदारांसमोर रेशन दुकानदाराच्या कामकाजाचा पाढाच वाचला. या दुकानाच्या तक्रारीबाबत चौकशी समिती नेमली असून चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य ती पुढील कारवाई होईल असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी रेशन दुकानदाराकडून ग्राहकांना केले जाणारे धान्य वाटप, दिली जाणारी वागणूक यावर महिलांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. यातून त्वरीत मार्ग काढावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य बहुजन लोक अभियानाचे अध्यक्ष आबा वाघमारे यांनी सोमवार (दि.११) दौंड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या भयानक संकटकाळात नागरीकांच्या तक्रारीवरून दौंड शहर व तालुक्यातील काही दोषी रेशनींग धान्य दुकानदारांचे प्रशासनाने कायमस्वरूपी लायन्स रद्द, अश्या प्रकाराची कारवाई केली होती. या कारवाईचे नागरीकांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर आता त्याच पैकी पुन्हा काही दुकाने सुरू करण्यास मुभा दिली जात असल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे रेशनींग धान्य वाटपात होणाऱ्या तक्रारीवर “चुकीला माफी नाही” अशी भूमीका प्रशासनाने  घ्यावी. 

असे झाले तरच धान्य वाटपाचा कारभारात नक्कीच बदल होईल. तसेच धान्य वाटपात बनवाबनवी करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी हा धडा राहील अशी मागणी होत आहे.