मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. याबाबत न्यायालयानेही हा संप थांबविण्याबाबत भाष्य केले आहे. न्यायालयाच्या आदेशांचा आदर करून एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.
नेमका हाच धागा पकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश मानावा आणि संप माघारी घ्यावा असे आवाहन करणारे शरद पवार कोण, ते काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे आणि ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला हवी ते शरद पवार करत आहेत त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री बदलला की काय असा उपरोधत टोला त्यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तप्त बनले असून महा विकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर आता महा विकास आघाडीच्या नेत्यांमधून काय प्रतिक्रिया येत याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.