Political / राजकीय
पुणे ग्रामीण : स्वतःच्या करनीने गावात कुणी विचारेना, दबदबा पार संपलाय, आगामी निवडणुका तर जवळ आल्या आहेत मात्र स्वतःचे कार्य इतके मजबूत आहे की सख्खा भाऊ मतदान करेल की नाही याची शाश्वती नाही. मग, आता काय करायचे, कसे नेत्याला पटवायचे, कारण नेता पटला तर जनता पटेल, शेवटी एकच मार्ग.. सोशल मीडिया..! पण त्यावर ऍक्टिव्ह कसे व्हायचे तर.. नेत्याच्या, पक्षाच्या विरोधात असणारी प्रत्येक बातमी शोधून काढायची, ज्या ग्रुपवर साडेचार वर्षे कुंभाकर्णाची झोप घेतली त्या ग्रुपवर आता ‛तुफान’ ऍक्टिव्ह व्हायचे. दिसेल त्या गोष्टीवर टीका करायची, पुढील पक्षाची कितीही जुनी, जाणकार, दिग्गज मंडळी असली तरी अजिबात विचार करायचा नाही. थेट आरोप सुरू ठेवायचे आणि काही दिवसांत मग पुन्हा एकदा नेत्याने स्वतःच्या हिमतीवर तयार केलेल्या गटातून पॉप्युलर व्हायचे म्हणजे मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा. पण हे करत असताना सावध राहिले पाहिजे अन्यथा गावात जी अवस्था आहे ती नेत्यापुढेही व्हायची. त्यामुळे आता ‛डोळे झाकून’ आरोपांची तुफान एक्स्प्रेस सुरू करायची म्हणजे सर्वांना वाटेल की सच्चा नेता भक्त हाच, आणि हे जर सक्सेस झाले तरच नेत्याकडून तिकीट मिळेल. नेत्यांकडून तिकीट मिळणं गरजेचं आहे कारण नेत्यांकडून तिकीट मिळाले तरच कुठंतरी निभाव लागेल नाहीतर जिथं गावात किंमत नाही तिथं अख्ख्या गणात कोण विचारणार..? त्यामुळे आता घाबरायचे नाही तर थेट सोशल मिडिया झिंदाबाद.. करत उडी घ्यायची. मित्रांनो वर जे तुम्ही वाचलेय ते त्याची सध्या अनेकजण रंगीत तालीम करत आहेत. अनेकवर्षे सुप्तावस्थेत राहिलेले हे स्वार्थी जिवाणू आता पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत, आणि याला निमित्त आहे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुका. या निवडणुका जिंकण्यासाठी मागील पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तुफान राडा घालणाऱ्या ‛तुफान एक्स्प्रेस’ आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत.
ज्यांना चार वर्षात कधी लोकांची जाणीव झाली नाही, कोरोना काळात रुग्णांना साधा फोन केला नाही असे तुफाने सध्या सोशल मीडियावर Active झाल्याचे दिसत आहेत. मात्र जनतेने अगोदरच हे तुफाने ओळखले असून फक्त निवडणुका तर जाहीर होऊद्या, मग बघा कसा कार्यक्रम लागतो असा गर्भगळीत इशाराच सर्वसामान्य जनता आपल्या देहबोलीतून देताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अचानक ऍक्टिव्ह झालेल्या तुफान्यांनी थोडी कळ काढल्यानंतर त्यांची खरी लायकी त्यांना जनता मतदानातून दाखवून देणार आहे हे मात्र नक्की.