आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील ‛हे’ नविन व्हिडीओ वानखेडेंच्या अंगलट येणार..! त्या आरोपांमुळे वानखेडे येऊ शकतात ‛चौकशीच्या’ फेऱ्यात!

मुंबई : ‛एनसीबी’ (ncb) च्या अधिकाऱ्यांनी (sameer wankhede) आलिशान क्रूझवर छापा मारून हाय प्रोफाइल व्यक्तींची मुले (aryan khan) ड्रग्जपार्टी (drugs party) करताना पकडली आणि मनोरंजन (bollywood) विश्वासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणात सर्वात जास्त प्रकाश झोतात आले ते एनसीबी (ncb) चे अधिकारी समिर वानखेडे. (sameer wankhede)
मात्र आता समीर वानखेडे हेच चौकशीच्या फेऱ्यात येताना दिसत असून या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी याचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असणारा प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाश्यात नवनवीन माहितीचे व्हिडिओ समोर येत असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. एनसीबी अधिकारी
समीर वानखेडे यांनी ज्यावेळी क्रूझ पार्टीवर छापा मारला त्यावेळी त्यांच्यासोबत फसवणूक प्रकरणात फरार असलेला आरोपी किरण गोसावी का होता, किरण गोसावीने आर्यन खानला पकडून एनसीबी ऑफिसमध्ये घेऊन जाण्याचे काय कारण, तेथे किरण गोसावी स्वतःच्या मोबाईलवरून आर्यन खान चे कोणाशी बोलणे करून देत आहे आणि का, हे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच किरण गोसाविचा सहकारी प्रभाकर साईल याने मीडियाला माहिती देताना किरण गोसावी याने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली पैकी 18 कोटींवर डील फायनल झाली आणि यातील 8 कोटी हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाणार होते असा खळबळजनक खुलासा करून एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात उभे केले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेले व्हिडीओ हे धक्कादायक असून त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

या सर्व प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आपल्याला नाहक ड्रग्स प्रकरणात अडकवले जात असून आपल्यावर संभाव्य पोलीस कारवाईपासून संरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे हे भ्रष्ट अधिकारी असून त्यांनी मुद्दाम बनावट केसेसमध्ये अनेकांना गुंतविल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते एक वर्षात तुरुंगात जातील असा दावाच त्यांनी भर सभेत केला होता, त्यावेळी नवाब मलिकांवर भाजपमधून टीकाही झाली होती आणि एका अधिकाऱ्यावर अश्या पद्धतीने दबाव आणून त्याला बदनाम करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र आता या ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारच समोर येऊन वानखेडे यांनी पैशांची मागणी केली आणि हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचा गौप्यस्फोट व्हिडीओद्वारे आणि मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. या सर्व प्रकारामुळे वानखेडे हे चौकशीच्या फेऱ्यात येण्याची दाट शक्यता असून प्रसिद्ध झालेले व्हिडिओ त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.