पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काल पुणे दौऱ्यावर असताना त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना नवाब मलिक यांच्याबाबत ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांचे प्रश्न नवाब मलिकांना विचारा, समीर चे प्रश्न समीर ला विचारा… मी त्यांच्याप्रश्नावर उत्तर द्यायला बांधील नाही. असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मीडियाला दिले.
हे होत असताना त्यांना पुन्हा त्याच विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने मला तेवढेच काम आहे का, मी पुण्याचा पालकमंत्री या नात्याने तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. मात्र जे विषय माझे नाहीत त्यावर मला प्रश्न विचारण्याचा जसा तुमचा अधिकार आहे तसाच नो कॉमेंट म्हणण्याचा अधिकार मलाही आहे असे उत्तर अजित पवारांनी उपस्थित पत्रकार प्रतिनिधींना दिले. आणि कोण काय बोलले त्यावर उत्तर देणे एवढेच काम मला राहिलेले नाही, मला भरपूर कामे आहेत, इतर कामांना वेळ पुरत नाही त्यामुळे जे माझ्या संबंधित प्रश्न असतील ते जरूर विचारा असे शेवटी अजित पवार म्हणाले.
ड्रग्स प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एनसीबी (ncb) राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले बनून बनावट केसेसमध्ये लोकांना गुंतवत असल्याचा आरोप नवाब मालिकांनी केला आहे तर हे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावत मी फक्त माझे काम करत आहे. माझ्यावर करण्यात येणारे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.