मावळ : पेट्रोल चे दर 111 रुपये, डिझेल 100 रुपये, गॅस 1000 रुपये, हे सर्व होत असताना केंद्र मात्र निर्णय घेत नाही आणि जाहिरात करायचे बहोत हुई महंगाई की मार.., पण आता अशी परिस्थिती आहे की बहोत हुई महंगाई की मार, छुपके बैठी भाजप सरकार असा घणाघाती टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे. मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी बोलताना सर्वत्र गरजेच्या वस्तूंचे भाव वाढत असताना केंद्रातील भाजप सरकार निर्णय घेत नाहीये. नोकरदार कसेबसे आपला संसार चालवत आहेत पण व्यावसायिक मात्र पूर्णपणे डबघाईला आले आहेत. अच्छेदिन आनेवाले है म्हणाले पण अच्छेदिन सोडाच जवळपास 1 वर्ष होत आले शेतकरी आंदोलन करतायत त्यांच्याकडे साधे लक्ष द्यायला कुणी तयार नाही हे अच्छेदिन आले का असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
कोरोना महामारी बाबत बोलताना त्यांनी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून तिसरी लाट टाळायची असेल तर मास्क वापरणे व सांगितलेल्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जावे असे आवाहन अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी केले.