Corona effect: गुलछडीची फुले शेतातच उमलली, गुलछडी शेतकऱ्यांना मोठा फटका



दौंड : सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)

संपूर्ण राज्यामध्ये सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद झाले आहेत याचा फटका आता दौंड तालुक्यातील विविध शेतकरी आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांची दुभती गाय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गुलछडीलाही याचा मोठा फटका बसत असून  मोठया कष्टातून शेतामध्ये लावण्यात आलेल्या गुलछडीची फुले ही शेतातच उमलत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गुलछडीच्या फुलांना लग्नसराई काळामध्ये चांगली मागणी असते, सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने गुलछडीच्या फुलांना 50 रुपयांपासून ते 200 रुपये किलो पर्यंत बाजारभाव मिळत होता. 



अर्ध्या पाऊण एकरामध्ये केलेली गुलछडीची शेती ही शेतकऱ्याला लाखो रुपये कमवून देत आली आहे परंतु अचानक ओढवलेल्या कोरोना संकटामुळे सध्या सर्वच व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत याचा मोठा फटका गुलछडीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत असून गुलछडीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर  शेतकऱ्यांनी केलेले पुढील आर्थिक नियोजन पूर्णपणे फिस्कटलेले पहायला मिळत आहे.

लाखो रुपये कमवून देणारी गुलछडीची फुले ही शेतातच उमलून पडत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.