घाबरू नका पण खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई : सर्वत्र कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे त्यामुळे सरकारने संचाबंदी सारखे निर्णय घेतले आहेत परंतु नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये म्हणून किराणा, मेडिकल व इतर गरजेच्या वस्तूंसाठी सुटही देण्यात आली आहे परंतु तरीही नागरिक गरज नसताना घराबाहेर पडत आहेत हे चिंतेची बाब असून नागरिकांनी यापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या लाईव्ह मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या विषयावर पुढे बोलताना त्यांनी जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेत आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही गोष्टी बघून मला धक्का बसत असून आम्ही अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचविण्यासाठी काम करत असतानाही काही जण ट्रक आणि टँकरमधून धोकादायक रित्या प्रवास करतात हे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात या महामारीचा प्रभाव सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती देण्यासोबतच नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचं कामही ते करताना दिसत आहेत.

या महामारीवर अधिक बोलताना त्यांनी हा उभा ठाकलेला हा शत्रू घराबाहेर पडल्यानंतर खूपच धोकादायक आहे. त्यामुळे जनतेने घरात राहण सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे. हे संकट जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत घरात येणार नाही, त्यामुळे जिथे आहात तिथे राहा आणि अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे. पोलिसांवर या कामाचा मोठा ताण वाढत आहे त्यामुळे जनतेने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे असल्याचे सांगत खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये, रुग्ण आढळल्यास सरकारी रुग्णालयात पाठवावे पण घाबरून जाऊन दवाखाने बंद ठेवू नये असे आवाहन केले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी शिर्डी संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ कोटी, तर सिद्धीविनायक संस्थांकडून ५ कोटींची मदत देण्यात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.