|सहकारनामा|
दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)
कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अजूनही दिसून येत आहे, कोरोना अदयाप संपलेला नाही त्यामुळे गणेश मंडळांनी व गणेश भक्तांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना नियमांचे पालन करीत, सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेत गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. व या उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी असे आवाहन दौंडचे उपविभागीय पो. अधिकारी राहुल धस यांनी केले. दौंड पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता- दक्षता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष शितल कटारिया, नगरसेविका पूजा गायकवाड, अरुणा डहाळे, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल धस म्हणाले, कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा होणार असल्याने सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना करताना तसेच विसर्जन करताना कोणतीही मिरवणूक काढू नये. विसर्जना दिवशी विसर्जन घाटावर महिलांची, लहान मुलांची गर्दी टाळण्यासाठी येथील नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागांमध्ये घरगुती गणपती विसर्जनासाठी हौद उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून विसर्जन घाटावर जास्तीची गर्दी जमणार नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन गणेशोत्सवा मधील उपाय योजनांबाबत आढावा घेणार आहे असेही धस म्हणाले.
गणेश मंडळांना व नागरिकांना आवाहन करताना दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की, कोरोना चा प्रसार होणार नाही याची दक्षता घेत व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे. तरच आपण संसर्गापासून दूर राहू. गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक मंडळाला पोलीस परवानगी घ्यावी लागणार आहे, न्यायालयाने दिलेल्या निर्देशा प्रमाणे रस्त्याला अडथळा ठरणार नाही अशा मंडपाची उभारणी मंडळांनी करायची आहे. आनंदी वातावरणात परंतु प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करा असेही घुगे म्हणाले.
गणेशोत्सवामध्ये प्रशासनाने कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत ऍड. अमोल काळे, आबा वाघमारे, नागसेन भेंडे, भारत सरोदे, प्रा.भिमराव मोरे,बी. वाय.जगताप यांनी सूचना केल्या.