‛बिन बुलाये मेहमान’ बनू लागले गावकऱ्यांची डोके दुःखी



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने ‛हाहा’कार माजवला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये याचा जास्त उद्रेक होताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अश्या परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्यसरकारणेही  लॉकडाउन चा आदेश काढत सर्व नागरिकांना घरामध्येच वास्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र या सूचनांचे पालन न करता अनेकजण आपल्या पै-पाहुण्यांकडे गावी जात आहेत. वर्षानुवर्षे गावाकडे न फिरकणाऱ्या या पाहुण्यांची अचानक गावाकडे सहकुटुंब सहपरिवार हजेरी मात्र सध्या गावकऱ्यांची डोके दुःखी बनत चालली आहे. शहरातून येणाऱ्या या ‛शहरी’ पाहुण्यांची गावकऱ्यांनीही चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुण्या शहरी मित्राने जुनी आठवण काढून भेटायची इच्छा जाहीर केली तर आता नको नंतर भेटू असे चाणाक्ष उत्तर सध्या गावमित्र देत आहेत.



साधारण २५-३० वर्षांपूर्वी गाव सोडून शहरामध्ये स्थायिक झालेले अनेक शहरवासी आता शहराकडे पाठ फिरवून माझा गाव, माझा देशचा पाढा गिरवत गावाकडे कुच करत आहेत. कोरोनाच्या भीतीने आता शहर वासीयांना आपले जुने गावच जास्त सुरक्षित वाटू लागले आहे त्यामुळे मिळेल त्या साधनाने पाहुण्यांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे येत आहेत. एरवी पाहुणा आला की येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्याची गावाकडची जुनी परंपरा आहे मात्र सध्याच्या ओढवलेल्या परिस्थितीमध्ये पाहुणा गावात येणे ही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बाब बनत आहे. आणि गावाकडे आलेल्या पाहुण्यांमध्ये जर कोणी शिंकले किंवा खोकले तर त्यांच्यापासून सुरक्षित अंतरापर्यंत घरातील स्थानिक मंडळी धूम ठोकत आहेत. त्यामुळे हवे हवेसे वाटणारे पाहुणे सध्याच्या परिस्थितीमध्ये ‛बिन बुलाये मेहमान’ वाटू लागले असून सध्यातरी हे पाहुणे गावकऱ्यांची डोकेदुखी बनत चालले असल्याचे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून दिसत आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी इकडे तिकडे गावी जाण्यापेक्षा प्रशासनाने दिलेले आदेश पाळून प्रत्येकाने आपल्या घरामध्येच राहिले तर निश्चितच या महामारीपासून सर्वांचाच बचाव होईल यात शंका नाही.