थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एकवीस दिवसाचा लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतरही अनेक टवाळखोर विनाकारण गावात मोकाट फिरताना दिसतात त्यांना आवर घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत परंतु नानाविध बहाणे सांगून ते रस्त्यावर मोकाट फिरतच आहेत. त्यामुळे अशा टवाळखोरांना अद्दल घडविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी कंबर कसली असून काल सोमवारी रात्री पासून अनेक दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण भागातील काही गावातील तक्रारी वाढल्याने ड्रोन कॅमेऱ्याने या भागामध्ये लक्ष ठेवणार असल्याचे जाहीर करताच येथील विभागीय पोलिस अधिकारी कामाला लागले आहेत. लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपापल्या घरात राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तसेच अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडले पाहिजे असे असताना काही जण केवळ उत्सुकतेने रस्त्यावर येऊन दुचाकी वाहनातून चकरा मारताना दिसतात यावर काल हवेली विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कडक भूमिका घेतली व अनेक दुचाकी वाहनांवर कारवाई केली असून आज मंगळवारी देखिल ही कारवाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
अनधिकृत पेट्रोलवितरित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी..
अत्यावश्यक वाहनाखेरीज कोणत्याही दुचाकी व चारचाकी वाहनांना इंधन पुरवठा केला जाणार नाही असा आदेश असताना दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोर चालकांना पेट्रोल कसे मिळते हा प्रश्न उपस्थित केला जात असून या भागामध्ये पेट्रोलचा काळाबाजार तर सुरू नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे अशा व्यक्ती शोधून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. पोलिस अधिकारी याबाबत काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे