एसटी’ला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी ‛इंटक’चे दौंडमध्ये एसटी बचाव आंदोलन



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

एसटीला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी व इंटकच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस( इंटक) चे सरचिटणीस मुकेश तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.1जुलै रोजी दौंड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

इंटकच्या वतीने यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. करोना महामारी मुळे केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने दिनांक 23 मार्च 2020 पासून एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे दररोज 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत असून महामंडळाचे एकूण 2100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात यावे. राज्यातील गोरगरीब शेतकरी,विद्यार्थी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेला सेवा देणाऱ्या एसटी महामंडळास मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सहाय्य करून सक्षम करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

एसटी महामंडळास नुकसान झाल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांना 50%च वेतन दिले आहे. देशातील सर्व राज्य मार्ग व परिवहन मंडळातील कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिले जाते. परंतु महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी असून शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांन पेक्षा कमी वेतन आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच त्यांना मूलभूत गरजा भागविणे सुद्धा अशक्य होत आहे. पगार कपातीमुळे कर्मचारी व व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इंटकचे राज्य सचिव दत्तात्रय तीगोटे, काँग्रेसचे पदाधिकारी हरेश ओझा, अतुल जगदाळे,रमेश शिंदे, राज्य सोशल मिडीया प्रमुख इस्माईल पठाण, सदाशिव रणदिवे आदि यावेळी उपस्थित होते.