Big News : जाहीर ‛फाशी’ घेऊन ‛आत्महत्या’ करण्यासाठी दोघांचा गटविकास अधिकरी, दौंड पोलीस ठाण्यात अर्ज, या तारखेला पहाटे 5:15 वाजता घेणार जाहीर फाशी!



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड तालुक्यात असणाऱ्या मळद या गावांतील शफिक रहिमान मुलाणी आणि अजय राजाराम म्हेत्रे या दोन तरुणांनी जाहीर फाशी घेऊन आत्महत्या करण्याची परवानगी मिळण्यासाठी गटविकास अधिकारी आणि दौंड पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. या फाशीचे कारण हे एका सामाजिक सभागृहामध्ये झालेल्या बांधकामातील अपहाराबद्दल आहे.

दौंड पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारी अर्जानुसार मळद येथे सन २०१३-१४ साली आमदार फंडातील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम झाले. मात्र या बांधकामामध्ये अपहार झाला असल्याचा या दोघांनी आरोप केला असून या झालेल्या अपहाराची रक्कम संत शिरोमनी सावता महाराज मंदीर मळद मध्ये दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अपहारकर्त्यांनी जमा न केल्यास आम्ही नाईलाजाने दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी अपहाराची रक्कम

परत मिळणेसाठी फाशी घेणार आहोत असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

जाहीर फाशी सारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण  सांगताना त्यांनी, अपहार प्रकाराबाबत आम्ही दि.१५/२/२०१६ पासून आजपर्यंत सदरच्या अपहाराबाबत तक्रारी अर्ज करीत असून न्याय मिळण्याची विनंती करीत

आहोत परंतू अद्याप पर्यंत आम्हाला सदर बाबत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नसून आमची पुर्णपणे निराशा झालेली आहे. सदरच्या अपहार रकमेला वसूल करण्यामध्ये शासकीय यंत्रणा जाणून बुजून डोळे झाक करत असून आमचा अत्ता संपूर्ण यंत्रणेवरील विश्वास उडालेला आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाने वरील विषयांकित परवानगीची मागणी करीत आहोत तरी फाशी घेण्याची परवानगी मिळेल   अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

असा असेल जाहीर फाशी घेण्याचा कार्यक्रम…

– दि.३१/१०/२०२० रोजी पहाटे ३ ते ४ या वेळात कुटूंबा समवेत अखेरची चर्चा

– ४ वाजता घरातील बाथरूममध्ये अंघोळ व ४ वाजून १५ मिनीटानी कुटुंबियांसोबत ४ वाजून ३० मिनीटापर्यंत अखेरचा नाष्टा

– पहाटे ४:३० वाजता मळद गावातील सर्व मंदीर आणि मस्जीदच्या दर्शनासाठी पायी जाणार

– पहाटे ४.३० ते ५ वाजेपर्यंत सर्व मंदीरांचे व मस्जीद मध्ये दर्शन घेऊन प्रार्थना करणार

– ५:५ मी. संत शिरोमणी महाराज मंदीर मळद या मंदिरात जाऊन १० मिनीटे नामस्मरण करणार .

– फाशी घेण्याचे नियोजित स्थळ संत शिरोमनी सावता माळी मंदिरात ५ वाजून १५ मिनीटाने ठरल्याप्रमाणे दोघेही मंदीरातील घंटीला दोघेही नायलॉन दोरीच्या रस्सीने फाशी घेणार! अशी जाहीर फाशीची रूपरेषा या तक्रारी अर्जामध्ये देण्यात आली आहे. वरील प्रमाणे नियोजित कार्यक्रम व वेळ असून आपण आम्हाला परवागनी द्याल अशी अपेक्षा आहे असे पुढे या अर्जात नमूद करण्यात आले असून या कामी आमच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या आमच्या दि. १५/२/२०१६ रोजीपासून

दिलेल्या अर्जातील लोकांना जबाबदार धरण्यात यावे ही आमची शेवटीची इच्छा असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. या जाहीर फाशीच्या मागणी आणि रुपरेषेमुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ माजली असून आता पुढे प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.