कोरोनाने दिला दौंड शहराला मोठा ‛झटका’, तब्बल 27 लोकांना नव्याने कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व ग्रामीण भागात एकाच दिवशी तब्बल 27 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण सापडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. आजच्या करोना अहवालाने नागरिकांसह प्रशासनाची झोप उडविली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत दि.१७ ऑगस्ट रोजी एकूण १६० संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले  होते, त्याचा अहवाल दि.१८ रोजी प्राप्त झाला आहे.१६०पैकी तब्बल २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, यामध्ये १८ रुग्ण शहरातील असून ९ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. अवघ्या चौदा वर्षापासून ८२ वर्ष वयोगटातील २० पुरुष व ७ महिलांना संसर्गाची  लागण झाली आली असल्याचे समोर आले आहे. गोपाळवाडी रोड-४, राज्य राखीव पोलीस जवान-२, नानविज-१, जगदाळे वस्ती-२, दत्तकला-१, चोरमले वस्ती-३, शालिमार चौक-२, तसेच बंगला साईड, गोपाळवाडी, चंद्रभागा नगर, भोईटे नगर, बोरावके नगर, फराटे गल्ली, वरद विनायक, साठे नगर, खाजा वस्ती,पिंपळगाव, गार व बोरीपार्धी येथील प्रत्येकी एकाचा रुग्णांमध्ये समावेश आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. शहरातून कोरोना हद्दपार होण्याची  स्थिती असताना पुन्हा 27 बाधित रुग्ण आढळल्याने सर्वांचीच चिंता परत वाढली आहे. शहरातून कोरोना आता गायब झाला आहे अशा अविर्भावात असणाऱ्या नागरिकांना कोरोना ने चांगलाच झटका दिला असल्याचे दिसते आहे.