दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील, आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या गुन्ह्यात 7 महिन्यांपासून फरार असलेला अटल गुन्हेगार नवनाथ शीरक्या चव्हाण याला दौंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून जेलची हवा दाखविली आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले. फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करा असा आदेश अधीक्षक देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिला आहे.
त्या अनुषंगाने मागील सात महिन्यांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार कारखाना परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पो. हवा. आसिफ शेख, पांडुरंग थोरात, पो. शि. अमोल गवळी, किरण राऊत, अमोल देवकाते, रवींद्र काळे, योगेश गोलांडे यांचे पथक तयार करून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सुचना केल्या. पथकातील पोलिसांनी वेशांतर करून कारखाना परिसरात सापळा रचला व तब्बल तीन तासाच्या प्रतीक्षे नंतर गुन्हेगार आरोपी उसाच्या शेतातून बाहेर पडताच त्याच्यावर झडप घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या.
दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली. दौंडच्या पोलीस हद्दीतील इतर फरारी आरोपींना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचे सुनील महाडिक यांनी सांगितले. पोलीसांच्या या धाडसी कामगिरी बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.