दौंड : दौंड तालुक्यातील एका बेटामध्ये सध्या एका ग्रामसेवकाने धुमाकुळ घातला आहे. या ग्रामसेवकाने ग्रामसेवक कमी आणि राजकीय पुढारी म्हणून जास्त मिरवायची सवय लावून घेतलेली दिसत आहे. दररोज स्वतःची राजकीय पोस्ट, राजकीय नेत्यांसोबत उठबस झाली कि लगेच त्या फोटोचे स्टेटस ठेवणे आणि सर्वासामान्य जनतेला अरेरावीची भाषा वापरून आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, आपण नेत्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात फिरत असतो, आपला वशिला जबर आहे असे म्हणून लोकांना ढोस मध्ये घेणे एवढाच कायतो एक कलमी कार्यक्रम या ग्रामसेवकाने राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जर या ग्रामसेवकाला राजकीय खुमखूमी इतकी असेल तर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन एखादी निवडणूक लढवावी मात्र शासकीय नोकरी करत असताना आपली राजकीय टिमकी वाजवू नये अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे.
ग्रामसेवक कोण असतो – ग्रामसेवक हा प्रशासकीय अधिकारी असतो, जो सरकारद्वारे निवडला जातो आणि ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो, तर राजकीय पुढारी (जसे की सरपंच, सदस्य) हे जनतेद्वारे थेट निवडणुकीने निवडले जातात आणि ते ग्रामपंचायतीचे धोरणात्मक निर्णय घेतात, त्यामुळे दोघांची भूमिका आणि निवड प्रक्रिया वेगळी असते, एक नोकरशहा तर दुसरे लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे ग्रामसेवक ची कामे ही रेकॉर्ड ठेवणे, सभेचे कामकाज व्यवस्थापित करणे आणि सरकारी योजना राबवणे ही त्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेमार्फत लेखी परीक्षा आणि प्रशिक्षणानंतर सरकारी नोकर म्हणून ग्रामसेवकाची निवड होते. त्यामुळे तो एक शासकीय कर्मचारी (नोकरशहा) असतो, जो प्रशासकीय काम पाहतो, राजकारणात थेट हस्तक्षेप करत नाही. थोडक्यात काय तर ग्रामसेवक हा ‘अंमलबजावणी करणारा’ असतो, तर सरपंच/राजकीय पुढारी हे ‘धोरण ठरवणारे’ असतात.

मात्र या ग्रामसेवकाने या पदाला दिलेली कामे आता बाजूला ठेवून राजकीय पुढारी म्हणून वावरण्यास सुरुवात केली आहे. ही व्यक्ती आता ग्रामसेवक कमी आणि राजकीय पुढारी जास्त वाटू लागल्याने त्याची तालुक्याबाहेर बदली करावी तरच हा सुधारेल अशी चर्चा बेटातील चौका चौकात होताना दिसत आहे. या ग्रामसेवकाने नेत्यांच्या नावाखाली अनेकांना अरेरावीची भाषा वापरून नको त्या फंदात आपले डोके चालविण्यास सुरुवात केल्याने आता त्याच्यामुळे नेतेमंडळीही बदनाम होऊ लागली आहेत. अश्या या ग्रामसेवकाची कामे कमी आणि चमकोगिरी जास्त होत असल्याने ग्रामस्थ मात्र पुरते जाम झाले आहेत.







