अब्बास शेख
दौंड : काल दौंड – पाटस रोडवर गिरीम च्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल जगदंबा येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात १० जण भाजले होते. या घटने प्रकरणी आता दौंड पोलिसांनी हॉटेल मालक आणि मॅनेजरवर निष्काळजीपणा आणि घरगुती सिलेंडरचा व्यवसायिक वापर केल्याप्रकरणी भा.न्या.स.का. क 125 (a), 125 (b), 287, 288; अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

काल घडलेल्या गंभीर घटनेबाबत महेष सदाशिव भोसले (वय 42, पोहवा 1158, नेमणूक दौंड पोलीस) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून हॉटेल जगदंबा चे मालक आरोपी किरण आबा सौताडे व हॉटेल मॅनेजर लहू विश्वनाथ जानभरे (दोघे रा. राशीन, ता. कर्जत, जि अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी कालची सर्व परीस्थिती पाहता यातील जगदंबा हॉटेलचे मालक किरण आबा सौताडे व मॅनेजर नामे लहू विश्वनाथ जानभरे दोघे (रा. राशीन, ता कर्जत, जि अहिल्यानगर) यांच्यावर निष्काळजी पणाचा ठपका ठेवला आहे.
दिनांक 07.01.2026 रोजी दुपारी 1.00 च्या पुर्वी हॉटेल जगदंबा, (दौंड पाटस रोड, गिरीम, ता.दौंड, जि पुणे) येथील किचनमध्ये ज्वलनषील पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे वर्तन करून, सदर ठिकाणी एकूण घरगुती वापराच्या भारतगॅस कंपनीचे विनापरवाना 12 गॅस सिलेंडर ठेवले होते व त्यासोबत 10 भारतगॅस कंपनीचे कमर्शियल वापराचे गॅस सिलेंडर ठेवून कोणत्याही प्रकारची ज्वलनषील पदार्थ हाताळतानाची काळजी न घेतल्याने वरील सिलेंडरपैकी घरगुती वापराच्या 1 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.
जखमी कामगारांची नावे – या स्फ़ोटामध्ये किचनमध्ये काम करणारे 1) धर्मा महेष निषाद, (रा. चेंबल आग्रा उत्तर प्रदेश, हल्ली हॉटेल जगदंबा, 2) रामप्रकाश वर्मा 3) बिपीन वर्मा, 4) करण वर्मा, 5) रामप्रकाष धर्मा, 6) कन्हैया, 7) दिपक कुमार, 8) मणीकुमार, 9) हटेसिंग उर्फ छोटुकुमार, 10) मोहन वर्मा यांना किरकोळ व गंभीर जखमा झाल्या. यातील सहा जणांना गंभीर जखमा झाल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर चार जणांवर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरील आरोपिंवर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोसई बिद्री हे करीत आहेत.







