केडगाव : दौंड तालुक्यात पुणे सोलापूर हायवेवर उभी राहिलेल्या वाहनांवर पाळत ठेवून त्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने आणि पुरुषांकडे असणारे पैसे पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. परवा कुरकुंभ येथील घटना ताजी असतानाच आता वाकडापुल (वाखारी) येथेही आज दि. २८ डिसेंबर रोजी पहाटे असाच प्रकार घडल्याने हायवेवरून प्रवास करणाऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी सौ. स्वप्नाली आकाश वाघमारे (रा.आंबेठाण, चाकण, पुणे) हे वाकडापुल येथील इंडियन पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या सेवा रस्त्यावर त्यांच्या ब्रिझा गाडीत आराम करत असताना पहाटे २:३० च्या दरम्यान तीन अनोळखी इसमांनी गाडीजवळ येउन गाडीच्या काचेवर लोखंडी रॉड ने मारून तुझ्याकडे जे काही आहे ते काढून दे असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यातील २२ ग्रॅम च्या सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला आहे.

परवा जशी घटना कुरकुंभ येथे घडली तशीच सेम घटना आज वाखारी येथील वाकडा पूल येथे घडल्याने वाहनचालकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेचा पुढील तपास पोसई वागज हे करीत आहेत.







