दौंड नगरपरिषदेत दुर्गादेवी जगदाळे यांच्यारूपाने नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे तर बहुमत भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाकडे

अब्बास शेख

दौंड : अत्यंत चुरशीच्या बनलेल्या दौंड नगरपरिषद निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने बाजी मारली असून या गटाच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी ५,७१२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे मात्र नगरसेवक पदांवर भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाने बहुमत मिळवल्याने दोन्ही गटांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नगरसेवक पदाच्या एकूण २६ जागांपैकी भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाने १७ जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी १० वाजता जुन्या शासकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ६ उमेदवार रिंगणात होते, तर २६ नगरसेवक पदांसाठी ८६ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी अर्धवट पॅनल उभारून आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र निकालाच्या कलावरून त्यांचे आव्हान किरकोळ ठरले.

दौंड नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासह २६ जागांसाठी मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे एका जागेवर २० डिसेंबर रोजी पुनर्मतदान घेण्यात आले होते. निकालाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे आघाडीवर होत्या. पहिल्याच फेरीत त्यांनी ९६३ मतांची आघाडी घेतली आणि ही आघाडी अंतिम निकालापर्यंत कायम राखत ५,७१२ मतांनी विजय मिळवला. नगरसेवक पदासाठी भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाचे १७ उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ९ उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाकडून आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारात आघाडी घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी आमदार रमेश थोरात व माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगराध्यक्ष पदाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्गादेवी जगदाळे यांच्या समर्थनार्थ सांगता सभा घेतली होती. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी निलप्रसाद चव्हाण यांनी काम पाहिले. तसेच मतदान व मतमोजणी केंद्राबाहेर दौंड पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.