अब्बास शेख
दौंड : दौंड नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. अवघ्या दहा दिवसांवर मतदान प्रक्रिया येउन ठेपली आहे. जो तो आपापल्या पद्धतीने मतदारांना आश्वासन देताना दिसत आहे मात्र या सर्व प्रक्रियेत दोन गटांत तुल्यबळ अशी लढत होताना दिसत आहे. एक दौंड चे नाक आहे तर दुसरे विकासाचे चाक आहे अशी काहीशी प्रतिक्रिया येथे पहायला मिळत आहे.

या ठिकाणी अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले विरधवल जगदाळे यांची पुतणी आणि इंद्रजित जगदाळे यांच्या कन्या दुर्गादेवी जगदाळे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांना प्रबळ विरोधक म्हणून मोनाली वीर या नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप पुरस्कृत मित्र पक्षाच्या आघाडीकडून लढत आहेत त्यांना दौंडचे आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांनी या निवडणुकीत उभे केले आहे.
जगदाळे परिवार हे दौंड शहराचे नाक आहे तर कुल, कटारिया हे विकासाचे चाक आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून येत आहे. त्यामुळे दौंड शहरातील जनता आता कोणाला निवडते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या अगोदर प्रेमसुख कटारिया यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर येथे प्रशासकीय व्यवस्थापक नेमण्यात आले होते. तब्बल आठ वर्षानंतर आता पुन्हा एकदा दौंड नगरपरिषदेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून दुर्गादेवी जगदाळे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची संधी देण्यात आली आहे तर नागरिक हित संरक्षण मंडळ आणि भाजप मित्र पक्षाकडून मोनाली वीर यांना संधी देण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकूण सहाजण उरले असून यात वरील दोन उमेदवारांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून कोमल रुपेश बंड, काँग्रेस कडून रुबीना करीम शेख, ‘आप’ कडून सरला रवींद्र जाधव, बसपा कडून पुष्पा मनोहर कोकरे हे उमेदवार रींगणात उतरले आहेत.
जगदाळे या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. भाजप आमदार राहुल कुल यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे विरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे आणि महायुतीतील मित्र पक्षांची साथ लाभली होती. आता मात्र गणिते बदलली असून जे अगोदर मित्र होते ते आता विरोधक म्हणून समोर आहेत त्यामुळे आता दौंडची जनता कोणाला पसंती देते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.







