अब्बास शेख

दौंड : दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण १३ जणांपैकी ७ जणांनी माघार घेतल्याने आता ६ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते त्यापैकी तब्बल १२१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्या १२१ पैकी ३५ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता नगरसेवकपदासाठी ८६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १) सरला रवींद्र जाधव (आप) २) दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (राष्ट्रवादी अजित पवार) ३) पुष्पा मनोहर कोकरे (बसपा) ४) कोमल रुपेश बंड राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) ५) रुबीना करीम शेख (काँग्रेस) आणि ६) मोनाली प्रमोद वीर (नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप विकास आघाडी) यांच्यामध्ये ही सरळ लढत होणार आहे.
दौंड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आपल्याकडे रहावे यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. यात सर्वात जास्त रोमहर्षक लढत ही दुर्गादेवी जगदाळे आणि मोनाली वीर यांच्यामध्ये होत असून दुर्गादेवी जगदाळे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढत असून मोनाली वीर या नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप विकास आघाडीकडून लढत आहेत.
दौंड शहरातील मातब्बर मंडळींपैकी बादशहा शेख यावेळी नागरिक हित संरक्षण मंडळाला साथ देत असल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बादशहा शेख यांनी वसीम शेख या माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यांना नागरिक हित संरक्षण मंडळाकडे खेचण्यात यश मिळवले असून अनेक ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीची मातब्बर मंडळी नागरिक हित संरक्षण मंडळाकडे वळवली आहेत.







