दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तिन्ही पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल, पहा कोणत्या पक्षाकडून कोण आहे उमेदवार

अब्बास शेख / अख्तर काझी

दौंड : आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दौंड नगरपरिषद कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. यात सर्वात जास्त लक्ष नगराध्यक्ष पदासाठी नेमकं कोण कोण अर्ज दाखल करतंय याकडे लागले होते.

आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात आणि अप्पासाहेब पवार हे दौंड शहरात ठाण मांडून बसले असून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षाकडून केले जात आहेत. आज सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, ज्येष्ठ नेते सोहेल खान, वैशाली नागवडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोमल रुपेश बंड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी मोनाली प्रमोद वीर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कुल गटाचे माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया आणि मोनाली वीर यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.

दौंड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव असून राष्ट्रवादी (अजितदादा पक्ष) आणि कुल, कटारिया यांच्या गटाकडून दोन्ही कुणबी उमेदवार देण्यातआले आहेत तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) कडून कोमल रुपेश बंड यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने आता ही निवडणूक रोमहर्षक  होणार यात शंका राहिलेली नाही.