दौंड शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, महाविकास आघाडी पॅनेलच्या अडचणीत वाढ

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने नेमलेले निरीक्षक हे चुकीचे धोरण राबविण्यासाठी वारंवारपणे सांगत असल्याने व जिल्हा कमिटीकडून सुद्धा याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत दौंड शहर काँग्रेस कमिटी मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

दौंड नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस) ला मोठा धक्का मानला जात आहे. दौंड चे माजी शहराध्यक्ष हरेष ओझा, अतुल जगदाळे, तन्मय पवार, श्रेयस मुनोत अशी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे असून त्यांनी त्यांचे राजीनामे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण (पाटील) यांच्याकडे पाठविले असल्याचे हरेश ओझा यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेत, आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये पॅनेल उभे करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने महाविकास आघाडी अडचणीत आली असल्याचे चित्र आहे.