अब्बास शेख

केडगाव, दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे ब्युटीपार्लरमधून सोन्याचे दागिने असलेली बॅग घेउन जाणाऱ्या युवतीला स्थानिक गुन्हे शाखा विभाग, पुणे ग्रामीण आणि केडगाव पोलिसांच्या तत्परतेने मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
ही घटना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 02 ते 2:45 दरम्यान केडगाव स्टेशन येथील मॉडर्न ब्युटीपार्लर येथे घडली होती. यातील फिर्यादी सुनंदा रमेश शेळके (रा.वाखारी,वाकडापुल, ता.दौंड) ह्या दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आपल्या दोन चुलत सुनांसह मॉडर्न ब्युटीपार्लर येथे फेशियल करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी घातलेले मनी मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स असा 90 हजारांचा ऐवज आपल्या बॅगेत काढून ठेवला होता.
त्याचवेळी दोन महिला आणि एक युवती त्या ब्युटीपार्लर मध्ये आल्या आणि काहीवेळ तेथे बसून त्या निघून गेल्या. त्यानंतर फिर्यादी सुनंदा शेळके यांना आपली बॅग ठेवलेल्या जागेवर नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्यांना ती सापडली नाही त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये आलेल्या त्या महिलांनी आपली बॅग चोरली असावी असा त्यांना संशय होता. याबाबतची फिर्याद त्यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली.
घटना गंभीर असल्याने या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण (LCB) आणि पोलीस हवालदार परशुराम मस्के यांच्याकडे देण्यात आला. यावेळी मस्के यांनी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार प्रतीक धिवार यांना सोबत घेऊन तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ने आपले पथक या ठिकाणी तपास करत असताना त्यांनी CCTV फुटेज आणि विविध माहिती गोळा केली त्यावेळी त्यांना केडगाव परिसरात राहणारी युवती प्रीती ही बॅग घेऊन गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिच्याकडे सखोल चौकशी केली.
मैत्रिणीची बॅग आहे म्हणून घेउन आले.. आरोपी युवती मात्र ही बॅग माझ्या मैत्रिणीची असल्याने मी ती घेउन आले होते असे तीचे म्हणणे होते तर मैत्रिणीने अनेक फोन केले त्यावेळी फोन का उचलला नाही असा प्रश्न पोलिसांना उपस्थित केला असता तिच्याकडे ठोस असे कोणतेच उत्तर नव्हते. या युवतीसोबत तिची आई देखील होती मात्र तिला यातले काहीच माहिती नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे तसेच ही बॅग माझ्या मैत्रिणीची आहे असे या युवतीने आपल्या आईला सांगितल्याने तीने या बॅगेबाबत अधिक चौकशी केली नाही.
अखेर युवतीला अटक.. हे प्रकरण नाजूक असल्याने यात पोलिसांनी सखोल तपास केला. यात या युवतीने ब्युटीपार्लर मधून आणलेली बॅग व त्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या घटनेत प्रीती हिला अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम मस्के करीत आहेत.







