राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दौंड नगरपरिषद, जिल्हापरिषद निवडणुकीबाबत अजित पवारांसोबत बैठक संपन्न

पुणे : दौंड नगरपरिषद आणि जिल्हापरिषद निवडणुकीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणुकीची व्युहरचना तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात नगरपरिषद आणि जिल्हापरिषद निवडणूका मोठ्या ताकदीने लढविल्या जातील यात आता शंका उरलेली नाही.

राज्यात महायुतीचे सरकार आहे मात्र अनेक जिल्हापरिषद आणि महानगर पालिका, नगरपालिका यांमध्ये महायुतीचे घटक असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी (अजितदादा) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची आपली स्वतःची ताकद आहे त्यामुळे महायुती असली तरी अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा आता आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेउन त्यांना निवडणुकीला स्वतंत्र सामोरे जाण्यासाठी व्युहरचना आखताना दिसत आहे.

कालच्या बैठकीत माजी आमदार रमेश थोरात, विरधवल जगदाळे, नंदू पवार, वैशालीताई नागवडे, गुरमुख नारंग, नितीन दोरगे, उत्तम आटोळे, वसीम शेख, सोनू धनवे आणि इतर मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. कालच्या या बैठकीवरून अजितदादांनी दौंडमध्ये जातीने लक्ष घातल्याचे दिसत असून नगरपरिषद आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा दावा दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कालच्या बैठकीत केला आहे.