अख्तर काझी


दौंड : दौंड नगरपालिकेला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी व केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी लाच मागण्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दौंड नगरपालिकेचे रोखपाल ओंकार मेनसे व लेखापाल भाग्यश्री येळवे यांच्या विरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोखपाल ओंकार मेनसे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती लाचलूचपत विभागाकडून मिळत आहे.
दौंड नगरपालिके ला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी व केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी या दोघांनी साधारणतः 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने 6 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, तक्रारी नंतर संबंधित विभागाने सदर तक्रारीबाबत शासकीय पंचा समक्ष पडताळणी केली असता या दोघांनी पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दौंड पोलीस स्टेशनला या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या कार्यकाळातील ही दुसरी घटना समोर आली आहे.







