दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-बोरिपार्धी शिवेवर असणाऱ्या आणि राज्यात अनेक शाखा असलेल्या अशा या नामांकित पतसंस्थेने खाजगी सावकाराला लाजवेल असा भयानक प्रकार आपल्या कर्जदारांसोबत सुरु केला आहे. कर्जदारांच्या शेत जमिनी जप्त केल्यानंतर आता या पतसंस्थेने आपला मोर्चा सह कर्जदार आणि जामीनदारांकडे वळवला आहे. कर्जापेक्षा दुप्पट रक्कम वसुल करूनही ऐन सनासुदीच्या तोंडावर या पतसंस्थेने शेतकरी जामीनदार यांची खाती लॉक करणे, विकलांग व्यक्तीचे खाते लॉक करुन त्याची शेतजमीन जप्त करण्याचा प्रताप केला आहे. ज्यावेळी या दिवाळीत लोकांची दीप लावण्याची लगबग सुरु आहे त्यावेळी या पतसंस्थेचे अधिकारी आपले ज्ञान पाजळत कर्जदारांना वेठीस धरत आहेत.


मिळत असलेल्या माहितीनुसार, या पतसंस्थेकडून कर्जदाराने २ लाखकर्ज घेतले त्या बदल्यात कोरोना काळात आलेल्या भयंकर परिस्थिती वगळता सेटलमेंट करुन जवळपास तीन लाख रुपये कर्ज रक्कम भरली. मात्र या पतसंस्थेने त्यांना पुन्हा दिड लाख रुपये भरण्यास सांगितले व ते भरले नाहीत तर पुन्हा त्याच्या व्याजाच्या रकमेचे हफ्ते पाडून कर्ज रक्कम भरण्यास सांगितले.
पुन्हा पुढील रक्कम भरत असताना कर्जदाराला अनेक अडचणी आल्या मात्र तरीही कर्जदाराने सुमारे सव्वा ते दिड लाख रुपये भरले. हे होत असताना अचानक कर्जदार, सहकर्जदार आणि जामीनदारांचे बँक खाते लॉक करण्यात आले. यामुळे कर्जदाराने माहिती घेतली असता, तुमची कर्ज रक्कम वेळेवर येत नाही त्यामुळे लाखो रुपयांची जमीन जप्त करण्यात आली, कर्जदार, विकलांग सह कर्जदार आणि जामीनदार यांची खाती लॉक करण्यात आली असल्याचे या पतसंस्थेने सांगितले.
हे सर्व ऐकून त्या कर्जदाराच्या पायाखालची मातीच सरकली कारण, दोन लाख रुपये कर्ज घेतले त्या बदल्यात या पतसंस्थेने त्यांची शेतजमीन तारण घेतली. अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे हफ्ते मागे पुढे झाले तरी त्या कर्जदाराने जवळपास तीन लाख रुपये भरले मात्र तरीही या बँकेने अजून दिड लाख भरा म्हणून विकलांग असणाऱ्या सहकर्जदाराची शेतजमीन जप्त केली नंतर त्यांची बँक खाती लॉक केली. तसेच व्याजाचे दिड लाख रुपये भरणा करण्यास सांगून कर्जदाराकडून सव्वा लाख रुपये भरुन घेतले मात्र आत्ता पुन्हा त्यांनी कर्जदार, सहकर्जदार आणि जामीन दारांचे खाते लॉक करुन अडीच लाख भरा नाहीतर मरा असा जणू फर्मानच काढला आहे.
त्यामुळे २ लाखाच्या बदल्यात जवळपास साडे चार लाख वसुल करुन पुन्हा ही पतसंस्था दोन ते अडीच लाख रुपये मागत असल्याने आता या कर्जदारावर या बँकेने आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. या बँकेने सह कर्जदार असलेल्या विकलांग व्यक्तीची जमिन तर जप्त केलीच मात्र नंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यावर मिळणारी विकलांग पेंशन आणि पंतप्रधान कृषी सहाय्यची रक्कमही बँक खाते लॉक करुन बंद केली आहे. विकलांग व्यक्तीने याचा जाब विचारला तर कोर्टाच्या आदेशाची प्रत दाखवत हे पतसंस्था कम कम बँकवाले त्यांना कोर्टात खेचण्याची धमकी देत असतात.
त्यामुळे खाजगी सावकाराला लाजवणारा हा पतसंस्थेचा भस्मासुर एखाद्याची आत्महत्या झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे काहीसे दिसत आहे. तर कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम वसुल करूनही अजूनही कर्जाची संपूर्ण मूळ रक्कम बाकी आहे ती पूर्ण भरा म्हणजे २ लाखाच्या बदल्यात एकूण सहा लाख भरा नाहीतर जमीन जप्त, खाती बंद ठेवणार असा दमच आता या विकलांग व्यक्तीला या पतसंस्थेचे अधिकारी देत आहेत.



