अब्बास शेख
दौंड : एक काळ असा होता की त्यांना मदतीची अत्यंत गरज होती, कुठून तरी पैसे येतील अण मग आपला प्रपंच सुरळीत होईल याची वाट पाहणारा भीमा पाटस चा कामगार त्यावेळी आर्थिक परिस्थितीने बेजार झाला होता. मात्र काळ बदलला आणि आज स्वतः हा कामगार दुसऱ्यांच्या मदतीला लाखो रुपये घेऊन धावताना दिसला आहे.
सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला त्यामुळे राज्यात भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुरामध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या शेतकरी आणि नागरिकांना भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांनी प्रत्येकी आपला एक दिवसाचा पगार देऊन सुमारे ६ लाख ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांची ही मदत आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे. यावेळी भीमा पाटस कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतलेल्या निराणी ग्रुपने सुद्धा ११ लाख रुपयांची आर्थिक मदत पूरग्रस्तांना दिली आहे.
दोघांची ही आर्थिक मदत घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी राज्यातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला निराणी शुगर्सने दिलेल्या ११ लाख रुपये व भीमा पाटस कारखान्याच्या कामगार बांधवांनी दिलेला एका दिवसाच्या पगारातून ६ लाख ५५ हजार रुपये तसेच संजय इनामके यांनी दिलेल्या ११ हजार रुपये असे सर्व धनादेश सुपूर्द केले आहेत. निराणी ग्रुप आणि भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.