अख्तर काझी
दौंड : दौंड नगरपालिका आगामी निवडणुक 2025-2030 साठी दौंड शहरातील एकूण 13 प्रभागातील आरक्षण सोडत आज जाहिर करण्यात आली. शहरातील 13 प्रभागांसाठी सर्वसाधारण पुरुष(6), महिला (6)
मागासवर्गीय पुरुष (3), महिला (3)
ओबीसी पुरुष (3), महिला (4)
अनुसूचित जमाती पुरुष (1) असे आरक्षण लागू झाले आहे.
आरक्षण सोडतीनंतर, मनासारखे आरक्षण न पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये थोडी खुशी थोडा गम असे वातावरण दिसून येत असून इच्छुक येथेही हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडावे अशी सगळ्याच पक्षांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण पडल्याने बहुतांशी कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला असतानाच तशीच काहीशी परिस्थिती प्रभागातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळत आहे.

आपल्या हक्काच्या प्रभागात अपेक्षेप्रमाणे आरक्षण न पडल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर नाराजी ठळकपणे दिसत होती. तर काही प्रभागांमध्ये मनाप्रमाणे आरक्षण पडल्याने इच्छुक उमेदवार मात्र खुशीत आहेत. प्रभागातील आरक्षणानंतर काही इच्छुकांचा तर निवडणुकीतूनच पत्ता कट झाल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. शहरात साधारणतः 40 ते 45 हजार मतदारांची संख्या असून प्रत्येक प्रभागात साडेतीन ते चार हजार मतदार संख्या आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रभागातील आरक्षण सोडतीनंतर आता निवडणुकीच्या तारखेकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट ,शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी , नागरिक हित संरक्षण मंडळ, वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे. यापैकी कोणाची महाआघाडी, महायुती होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.