केडगावमध्ये बोगस प्लॉटिंगचा सुळसुळाट, अनेकांवर पश्चातापाची वेळ.. प्लॉट घेण्याअगोदर ‘या’ बाबी तपासा

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथे बोगस प्लॉटिंगचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळत आहे. जी जमिन फक्त शेती करण्यासाठी आरक्षित आहे त्या जमिनीवर अनधिकृतपणे 1, 2, 3 गुंठ्याचे प्लॉट पाडून त्याची धडाधड विक्री केली जात आहे. ही बाब प्लॉट घेणाऱ्यांसाठी अतिशय घातक असून त्यांच्या प्लॉटवर आणि बांधलेल्या घरांवर कधीही गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एजंट आणि प्लॉटिंग करणाऱ्यांची अनधिकृत शक्कल – अनधिकृत प्लॉटिंग करणारे अगोदर शेती झोनमधील एकर, दोन एकराचा तुकडा शेतकऱ्याकडून कराराने किंवा विकत घेतात. नंतर त्यामध्ये मनाला वाटेल तसे दहा, बारा फुटाचे रस्ते बनवतात. त्यानंतर त्या शेतजमिनीचे एक, दोन, तीन गुंठ्याचे तुकडे पाडून ते प्लॉट लोकांना विविध आमिष दाखवून, जाहिरात करुन विकले जातात. मात्र हे सर्व अनधिकृत असते आणि यामधून त्या एजंट आणि प्लॉट विकणाऱ्याला भरपूर नफा कमवायचा असतो. भविष्यात या प्लॉटवर अधिकृत घर बांधकामाला कधीच परवानगी मिळत नाही आणि जर परवानगी न घेता घर बांधलेच तर भविष्यात त्यावर पुण्यात जी कारवाई झाली तशी कारवाई केव्हाही होऊ शकते.

‘एनए’ म्हणजेच अकृषिक आणि रहिवासी झोन असलेलाच प्लॉट घ्या अन्यथा भविष्यात पश्चातापाशिवाय काहीही हाती लागणार नाही – तुम्हाला जर घर बांधण्यासाठी एखादा प्लॉट घ्यायचा असेल तर अगोदर तो प्लॉट एनए म्हणजेच अकृषिक आहे का आणि तो झोन रहिवासी झोन आहे का हे पहा. जर तो प्लॉट एनए असेल तर तो बोगस एनए केलेला तर नाही ना यासाठी त्या प्लॉटमधील रस्ता 9 मिटर किंवा 30 फूट रुंदीचा आहे का हे पहा. जर प्लॉटमध्ये जाणारा रस्ता 30 फूट नसेल तर मात्र हा प्लॉट काहीतरी काळेबेरे करुन एनए केलेला असू शकतो त्यामुळे त्याची संपूर्ण एनए ऑर्डर तपासा आणि मगच तो प्लॉट खरेदी करा. तसेच त्या प्लॉटचे तुमच्या नावे वयक्तिक प्रॉपर्टीकार्ड तयार होते का हेही अवश्य पहा अन्यथा अश्या प्लॉटपासून दूरच रहा.

प्लॉट घेण्याआधी या बाबी तपासा –

प्लॉट खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही त्या जागेचा नकाशा आणि मालकी हक्काची कागदपत्रे तपासावीत, जमीन ‘एनए’ (नॉन-ऍग्रीकल्चरल) आहे का, ‘टीपी’ (टाऊन प्लॅनिंग) किंवा ‘पीएमआरडीए’ कडून त्याचा लेआऊट मंजूर आहे का आणि बांधकाम नियमांचे पालन केले आहे का, याची खात्री करावी. वरील प्रमाणे त्या जागेचा नकाशा, लेआऊट मंजूर आहे का हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. कारण मंजूर लेआऊटमुळे जमिनीच्या मालकी हक्काबद्दल आणि जागेच्या सीमांबद्दलची कायदेशीर माहिती मिळते आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणीपासून तुम्ही दूर राहू शकता.

मालकी हक्काचे कागदपत्र : विक्रेता मालक आहे की नाही हे तपासण्यासाठी मालकी हक्काची कागदपत्रे तपासा.
एनए (NA) परवानगी: जमीन शेतीसाठी किंवा इतर गैर-कृषी कामांसाठी आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘एनए’ परवानगीची पडताळणी करा. बांधकाम नियमांचे पालन : भूखंड विकत घेण्यापूर्वी, बांधकाम नियमांचे पालन केले गेले आहे की नाही हे तपासा. अनधिकृत प्लॉटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असतो आणि ते बांधकाम किंवा झोनिंग नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे अश्या प्लॉटवर कधीही गदा येऊ शकते.

स्वतःची फसवणूक टाळा : अनधिकृत प्लॉटिंगमध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे कोणतीही रक्कम देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करा. ती जागा ‘एनए’ म्हणजेच अकृषिक आहे का, ती जागा रहिवासी झोन म्हणून घोषित झाली आहे का, त्याचे तुमच्या नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होते का आणि प्लॉटमध्ये पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का हे अवश्य तपासा.

भविष्यात उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी : अनधिकृत प्लॉट घेतल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात, आणि आपले राहते घर सुद्धा संबंधित विभागाकडून पाडले जावू शकते हे तुम्ही नुकत्याच पुण्यात करण्यात आलेल्या कारवाईवरून समजू शकता. त्यामुळे लाखो रुपयांचा प्लॉट घेताना वरील बाबी अवश्य तपासा आणि जर तुमची कोणी फसवणूक केली असेल आणि तुमच्या फसवणूकीची कोणी दखल घेत नसेल तर आम्हाला पुढील नंबरवर संपर्क करा, संपर्क क्रमांक – 9096777750

क्रमशा..