अख्तर काझी
दौंड : सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ,सुप्रीम कोर्टातील एका सुनावणी दरम्यान वकिलाने बूट फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. वकिलाने सर न्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणाही त्याने दिली असल्याचे समोर आले आहे. या सर्व घटनेचा दौंड शहरातील सर्वच दलित संघटनांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
सर न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठांसमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर अचानक पणे सर न्यायाधीशांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी पायातील बूट काढून सर न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा हल्ला रोखला. या वकिलाला न्यायालयाच्या आवारातून तातडीने बाहेर काढण्यात आले.
यावेळी या वकिलाने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा दिल्याचे तेथे उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया ने तातडीने कारवाई करून वकील राकेश किशोर यांची सनद तत्काळ रद्द करण्याचा आदेश दिला आहे. बार संघटना आणि वकिलांसह सर्व स्तरातून राकेश किशोर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला आहे.
दौंड शहरातील सर्वच दलित संघटनांच्या वतीने देशाचे राष्ट्रपती यांच्या करिता पोलीस प्रशासनाकडे निषेधाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी व भीम अनुयायी उपस्थित होते. वकिलाने सर न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ही बाब न्यायपालिकेतील सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अपमान करण्याचा मुख्य हेतू असून असे हे कृत्य संविधान विरोधी असल्याने संबंधित वकिलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वकील राकेश किशोर याच्या धीक्काराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.