यवत : गेल्या महिन्यात यवत गाव जातीवादी कट कारस्थानांमुळे धगधगत होते मात्र आता सर्व परिस्थिती निवळली असून येथील स्थानिक हिंदू-मुस्लिम बांधवांनी जातीवादाला थारा न देता वेळ आल्यावर आम्ही सगळे एक आहोत याची प्रचिती आपल्या कृतीतून आणून दिली आहे. यवतच्या मुस्लिमांनीही मागे न राहता आज आपल्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
आज दि. ०२ ऑक्टोबर रोजी यवत मुस्लिम जमात आणि हजरत बडे शहावली बाबा यंग सर्कल यवत यांच्यावतीने भूम परांडा तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे जवळपास दीडशे किट तयार करून एका मालवाहतूक वाहनातून पाठविण्यात आले आहेत. आमदार राहुल कुल यांच्या प्रेरणेने आज ही मदत किट रवाना करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पूरग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल, साखर, चहापावडर, मीठ तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याची योजना मुस्लिम समाजातील काही तरुणांनी समाजासमोर मांडली होती. या संकल्पनेला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि जवळपास दीडशे किट तयार झाले.
ही मदत करत असताना यापुढे अजूनही जी काही शक्य ती मदत करता येईल तितकी गोळा करून अजून एक गाडी पाठवण्यात येईल अशी माहिती समाज प्रमुखांच्या वतीने देण्यात आली आहे. समाजातील काही तरुण ही मदत घेऊन आज भूम परांडाकडे रवाना झाले आहेत. संबंधित ठिकाणी मदत करून त्या ठिकाणी अजून कुठल्या गोष्टीची कमतरता आहे याचा विचार करून त्या ठिकाणी ती मदत पुरवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
यवत मधून भूम परांडा या ठिकाणी मदत पाठवताना यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, विनायक अवचट, दत्तात्रय देवकर, समीर सय्यद, समृद्धी तांबोळी, मुबारक शेख, शब्बीर सय्यद, इलाही शेख, साजिद सय्यद, अबरार शेख, हारुण पठाण, आरिफ तांबोळी यांसह अन्य तरुण उपस्थित होते.