केडगाव : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यामध्ये तर पावसाने दणादाण उडवली आहे. मराठवाड्यातील लोकांचे संसार पाण्यात बुडाले असून संपूर्ण राज्यातून पूर ग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आता अशीच मदत दौंड तालुक्यातील केडगावमधून पाठविली गेली आहे.
ही मदत येत्या शुक्रवारपर्यंत पूरग्रस्तांपर्यंत पोहोच होणार आहे. या मदतीमध्ये केडगाव येथील शेतकऱ्यांनी एक हजार क्विंटल गहू, सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्योजक नवरात्री उत्सव मंडळातून 50 किराणा किट, केडगाव बाजारपेठेतील एका कुटुंबाने 100 ब्लँकेट, कापड दुकानदारांनी मुलांच्या शाळेचे 50 ड्रेस, गुळ उद्योजकांनी 50 किलो गूळ आणि युवा उद्योजकांनी अडीचशे वही व शैक्षणिक वस्तू दिल्या आहेत.
पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात केडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्ता शेळके, सदस्य नितीन जगताप, निलेश कुंभार आदी सदस्यांनी या ठिकाणी मदत गोळा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.