सुपे येथे रस्त्यावरील वाहनांवर चोरट्यांची दगडफेक, थेट सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

सुपे (बारामती) : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे – फॉरेस्ट रस्त्याने साबळेवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काल रात्री या रस्त्याने दूध घेऊन जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करुन चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आहेत. चालकाने प्रसंगावधान राखत या हल्ल्यातून आपली सुटका करुन घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी हे प्रकार रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील  गोलांडवाडी आणि शिर्सुफळ अशा दोन ठिकाणी दुपारी अडीच वाजता घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरीकांना विनंती करत, जर आपल्या परिसरात एखादे नंबरप्लेट नसणारे वाहन आढळल्यास परिसरातील नागरीकांना तसेच जवळच्या पोलीस स्टेशनला तातडीने संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

तसेच खा सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना विनंती करत या परिसरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे, चोरटे दिवसाढवळ्या घरफोड्या करीत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी आपण कृपया विषयाचे गांभीर्य समजून घेऊन तातडीने कारवाई करावी. या चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करुन गृहखात्याने नागरीकांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे.