सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात एनसीसी युनिट सुरू, वीस वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न झाले साकार

केडगाव (दौंड) : केडगाव येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र सिग्नल वन काॅय बटालियनचे एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) चे अनुदानित सुरू झाले. एनसीसी युनिट सुरू झाल्यामुळे महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी वीस वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी सांगितले.

एनसीसी युनिट मुळे महाविद्यालयाच्या गौरवामध्ये भर पडली असून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, अनुशासन, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, आत्मसन्मान, निर्णय क्षमता, राष्ट्रभक्ती हे गुण विकसित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुभेदार संतोष मोहोतो यांनी एनसीसी उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन एनसीसीच्या माध्यमातून भारतीय तीनही सैन्यदलांमध्ये अधिकारी होण्याची संधी प्राप्त होत असल्याचे सांगितले. एनसीसी म्हणजे राष्ट्राप्रती समर्पित होण्याचा उत्तम मार्ग असल्याचे त्यांनी विशद केले.

त्यांच्याच परीक्षणाखाली प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 52 विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांची निवड विविध शारीरिक व लेखी चाचण्या घेऊन करण्यात आली. सुभेदार राहुल तावरे यांनी महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनुषंगित बाबींविषयी मार्गदर्शन केले. तर मेजर डॉ. दीपक जांभळे यांनी विद्यार्थ्यांसाठी उद्ब़ोधन वर्ग घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनसीसी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले. जेजुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागणे यांनी एनसीसी प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोलाची मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी अधिकारी बनण्याची ही मोठी संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव धनाजी शेळके यांनी केले. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर यांनी एनसीसी युनिट सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर डॉ. श्यामराव वासनीकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध देशभक्तीपर उपक्रम राबवून एनसीसी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

महाविद्यालय संकुल विकास समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अनुराधा गुजर, डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, डॉ. विशाल गायकवाड, डॉ. तन्वीर शेख, डॉ. अरविंद मिंधे, प्रा. गणेश निंबाळकर, प्रा. शुभम ताकवणे, डॉ. सुनिता बनकर, प्रा. किशोर आढाव, प्रा. श्रद्धा जगताप व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.