पोलिस असल्याचे सांगून आदिवासी महिलेवर बलात्कार, दौंडच्या देऊळगाव राजे येथील घटना

राहूल अवचर

देऊळगाव राजे, दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे (हाडगळेवस्ती) येथे शनिवार दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता एका आदिवासी महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. स्वतः पोलीस असल्याचे सांगत संतोष दादा हाडगळे (रा.हाडगळेवस्ती, देऊळगाव राजे) या नराधमाने घरात घुसून महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या लहान मुलासोबत घरी असताना आरोपीने ‘मी पोलीस आहे, तुझे घर तपासायचे आहे’ असे सांगून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती केली. घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीला अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांकडून होत आहे. या घटनेमुळे देऊळगाव राजेसह परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.