शेतात मोटर बंद करण्यासाठी गेला अण होत्याचं नव्हतं झालं.. कोऱ्हाळेत शॉक लागून युवकाचा मृत्यू

बारामती : ज्या दिवशी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात होता त्याच दिवशी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे  येथे मात्र एक दुःखद घटना घडल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे पहायला मिळाले आहे. शेतातील इलेक्ट्रिक मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या निलेश सोपान अडागळे (वय ३४, रा. कोर्‍हाळे बुद्रुक ता. बारामती) या युवकाचा शॉक लागून मृत्यु झाला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, निलेश हा शेतामधील इलेक्ट्रिक मोटार बंद करण्यासाठी गेला असता मोटारीचा स्टार्टर ज्या बॉक्समध्ये बसविण्यात आला होता त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. निलेशने ज्यावेळी बॉक्स ला हात लावला त्यावेळी त्यास जोरदार इलेक्ट्रिक शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोऱ्हाळे गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

निलेश हा कोऱ्हाळे येथील एका मंडळाचा अध्यक्ष होता. तसेच त्याचा युवकांमध्ये दांडगा संपर्क होता. निलेशच्या मागे त्याची पत्नी शितल, तसेच दहा वर्षांची मुलगी अदिती व सात वर्षांचा मुलगा अर्णव असा त्याचा परिवार आहे. त्याचे वडील सोपान अडागळे हे  एसटी कंडक्टर होते ते आता निवृत्त झाले आहेत.