अब्बास शेख
पुणे | सध्या पुणे जिल्ह्यात माजी आमदार, युवा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरु झाली आहे. विविध तालुक्यातील माजी आमदार आणि नेते मंडळींचे भाजप प्रवेश होत असल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये अजितदादांची असलेली ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा या भागामध्ये सुरु झाली आहे तर अजितदादांनीही हे सर्व ओळखून आता आपली माणसं त्या त्या भागात पुन्हा सक्रिय केल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये दौंड चे आमदार राहूल कुल हे भाजप पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भोर चे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, इंदापूरचे उभरते युवा नेतृत्व प्रविण माने या तीन महत्वाच्या व्यक्तींनी केलेल्या भाजप पक्ष प्रवेशामागे दौंड चे आमदार राहुल कुल यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते. वास्तविक पाहता पक्ष प्रवेश करणारे हे लोक काँग्रेस किंवा जेष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे जरी असले तरी यांची ताकद ही अजित पवारांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावू शकते हेही तितकेच खरे असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्यात आपली ताकद वाढवत असल्याने भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना पहायला मिळणार की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा आपली जपून ठेवलेली अस्त्रे आता बाहेर काढण्यास सुरुवात केली असून या अस्त्रांना नव्याने धार लावण्याचे काम सध्या झपाट्याने सुरु आहे. आमदार कुल यांनी भाजपसाठी बाहेर पेरणी सुरु केल्याने त्यांच्या तालुक्यात त्यांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा रमेश थोरात यांना अजितदादांनी ताकद दिल्याचे बोलले जात आहे.
दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांचा अजितदादांच्या गटात झालेला पक्ष प्रवेश हे या ‘राजकीय घमासानी’ ची नांदी असल्याचे सांगून जातो. त्यातच ज्या प्रकारे अजित पवारांनी रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांना खास शैलीत संबोधले ते पाहता भविष्यात तुषार थोरात हे तालुक्यातील ‘थोरात गटा’चे नेतृत्व करतील यात शंका राहीलेली नाही. अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप घेरू पाहत आहे तर अजित पवार सुद्धा आता आपला हक्काचा जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना मोठी ताकद देताना दिसत आहेत.