अख्तर काझी
दौंड : सततच्या कौटुंबिक वादातून वैतागलेल्या पतीने दौंड न्यायालयाच्या आवारात ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी त्याच्यासोबत त्याची दोन लहान मुलेही होती, परंतु दौंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला. मोहन दशरथ वीरकर (वय45,रा. लोखंडे वस्ती, दौंड) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार किरण डुके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.17 जुलै रोजी सकाळी 11:40 च्या दरम्यान न्यायालयातील पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस स्थानकामध्ये फोन आला की न्यायालयाच्या आवारात एकजण आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे. खबर मिळताच डुके यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठविले व त्याला ताब्यात घेतले. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दौंड पोलीस स्टेशनला आणून त्याचे समुपदेशन करण्यात आले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलो होतो, परंतु तेथे माझी कोणीच दखल घेतली नाही म्हणून मी न्यायालयाच्या आवारातच आत्मदहन करत होतो असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे म्हणणे आहे परंतु ते पोलीस स्टेशनला आलेच नाहीत असे पोलिसांनी सांगितले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या वीरकर सोबत त्याची दोन मुलेही होती, त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न जर यशस्वी ठरला असता तर मोठी अनर्थ घडला असता परंतु दौंड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आत्मदहन दहन करणाऱ्याचा पोलिसांनी नव्हे वकिलांनी जीव वाचवला –
गुरुवार दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 : 30 च्या सुमारास दौंड न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले त्यावेळी त्या सोबत त्याची 2 छोटी मुले सुद्धा होती. त्याने स्वतःवर पेट्रोल ओतून तो स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत असतानाच दौंड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रशांत गिरमकर व एक पक्षकार इसाक मेहबूब शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारून त्याला दाबून धरले व पेटवून घेण्याच्या कृत्यापासून त्यास रोखले. यावेळी त्यांनी या व्यक्तीकडून काडीपेटी काढून घेतली व तीन जीव वाचवले. यावेळी त्यांनी त्यास शांत करून त्याची विचारपूस केली व त्याला त्याची जबाबदारी समजावून त्यास शांत केले. या सर्व घटनेनंतर पोलिसांना बोलावून त्या व्यक्तीस पोलिसांकडे संपूर्त केले. त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव पोलिसांनी नव्हे तर दौंड ॲड.बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर आणि त्यांच्या पक्षाकाराने वाचवला असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.