अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ प्रवाश्यांना लुटून त्यातील एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला होता. आता यातील त्या बलात्कारी नराधमाचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले असून या नराधमांना शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथके या आरोपिंचा शोध घेत आहेत. यातील आरोपी कोणाचे ओळखीचे असल्यास त्वरित दौंड पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पंढरपूरच्या दिशेने वारीकडे निघालेल्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ कोयत्याचा धाक दाखवून या भक्तांची लूटमार करण्यात आली होती. यावेळी सुमारे दिड लाखांच्या ऐवजाची चोरी करण्यात येउन एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या भयानक घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आली आहे.
आमदार राहुल कुल यांचा पाठपुरावा – या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी “संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा.” तसेच, दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.