Political : दौंड शहरात तुफान गर्दी, ग्रामपंचायतीची उमेदवारी मिळत नसल्याने अनेकांच्या कोलांट उड्या..



दौंड : सहकारनामा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने दौंड शहरामध्ये उमेदवार, कार्यकर्ते आणि त्यांच्या गाड्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीमुळे  अनेकांना आपली वाहने सुमारे अर्धा ते एक किलोमीटर दूरपर्यंत लावावी लागत होती.

दौंड तालुक्यामध्ये सध्या  ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने स्वतःची ताकद अजमाविण्यासाठी कंबर कसली आहे.

मात्र अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड होऊन त्यांनी थेट दुसऱ्या गटात कोलांट उड्या मारून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेकांना या कोलांट उड्या फायदेशीर ठरल्या आहेत तर अनेकांना या उड्या अंगलट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दौंड तालुक्यात प्रबळ असे दोन पारंपारिक गट आहेत, एक कुल गट तर दुसरा थोरात गट आहे. मात्र शिवसेनेनेही आपले उमेदवार येथे देण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. परंतु राज्यात महाआघाडी सरकार असल्याने येथेही युती होते की हे सर्वजण एक दुसऱ्याच्या विरोधात लढतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.