आमदार राहुल कुल यांच्याकडून पालखी तळांची पाहणी, अधिकाऱ्यांना केल्या विशेष सुचना

दौंड : पंढरपूर आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. २३ जून रोजी यवत येथे व दि. २४ जून रोजी वरवंड येथे मुक्कामी असून यानिमित्ताने पालखीतळ, कालभैरवनाथ मंदिर यवत व विठ्ठल मंदिर, वरवंड याठिकाणी तयारीची व अनुशांघिक कामाची आमदार राहुल कुल यांनी पहाणी केली.

यावेळी पालखी मार्गावरील अनावश्यक झाडे – झुडपे काढून टाकावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, जलसंपदा विभागाने व पाणीपुरवठा विभागाने यंत्रणा तैनात ठेवावी, पंचायत समिती व आरोग्य विभागाने फिरते शौचालय, अतिदक्षता विभागाचे वेड, रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी केंद्र, स्वच्छतागृह, पालखीतळाची स्वच्छता व आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, वनविभागाने वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे, पथदिव्यांची सोय करत आपत्कालीन कक्ष उभारावा, पोलिसांनी वारीच्या दरम्यान चोरीचे प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच पावसाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन वारकरी व भाविक भक्तांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा विशेष सूचना आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.

वारीच्या मार्गावरील स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची तयारी, पाणी, वीज, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, दौंड तालुका वारकरी भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे, मयूर सोनवणे, चेतन शिंदे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, वन परीक्षेत्र अधिकारी राहुल काळे, यवतचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष बापू यादव, बाळासाहेब लाटकर, नाना महाराज दोरगे, इम्रान तांबोळी, गणेश शेळके, वरवंडचे माजी सरपंच गोरख दिवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर, बाजार समितीचे संचालक अशोक फरगडे, खरेदी विक्री संघांचे संचालक सचिन सातपुते आदी उपस्थित होते.