दौंड : दौंड शहरातील हरी ओम फोटो स्टुडिओ मधील फोटोग्राफरला झालेल्या मारहाणीचा दौंड तालुका फोटोग्राफर संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मारहाण करणाऱ्या युवकांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून यावेळी करण्यात आली आहे.
संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी आज (दि.13जुन) पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील, वैभव म्हेत्रे, सचिन गायकवाड, सुनील मुलचंदानी, कैलास पंडित तसेच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
संघटनेकडून पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, फोटो तयार झाले नाहीत या कारणास्तव दि. 11 जून रोजी फोटोग्राफर श्रीकांत घोडके यांना दोन युवकांनी मारहाण केली. फोटो स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा विषय अत्यंत गंभीर आहे. सदर घटनेचा संघटना निषेध करत असून फोटोग्राफरला मारहाण करणाऱ्या युवकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे, त्यामुळे आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेतील आरोपीं विरोधात निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार राहुल घाडगे यांनी सांगितले.