विजेच्या धक्क्याने लोणी काळभोर येथे महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

लोणी काळभोर : नागरिकांच्या सोईसाठी उन्हाळा असो अथवा पावसाळा, सर्व ऋतुंमध्ये दिवस रात्र महावितरण चे कर्मचारी काम करत असतात. मात्र हे काम करताना अनेकवेळा त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो आणि कधी कधी भयंकर अपघात होऊन त्यांचा जिवही जातो. अशीच एक हृदयद्रावक घटना लोणी काळभोर येथे घडली आहे. भर पावसात विद्युत दुरुस्तीचे काम करणाऱ्या प्रज्ञापाल सोनसाळे या महावितरण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, महावितरणचे आदर्श कर्मचारी म्हणून ओळखले जाणारे प्रज्ञापाल सोनसाळे हे आज सकाळच्या सुमारास विद्युत लाईन दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने ते खाली कोसळले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

प्रज्ञापाल सोनसाळे हे अतिशय नम्रपणे आपले कार्य बजावत असत. त्यांनी प्रत्येकवेळी  कामाला प्राधान्य देऊन अनेकवेळा जीवावर उदार होऊन जोखमीची कामे केली होती, वेळ प्रसंगी त्यांनी आपल्या जीवाची कधी पर्वा केली नव्हती. सोनसाळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण लोणी काळभोर व परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्यांच्या मित्रांसह राजकीय व्यक्तींकडूनही त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली जात आहे.