अख्तर काझी
दौंड : शहरातील खाटीक गल्ली परिसरात पोलिसांनी छापा मारून 2 लाख 16 हजाराचे बाराशे किलो गोमांस जप्त केले आहे. दौंड पोलिसांनी याच परिसरात राहणाऱ्या आसिफ कासम कुरेशी, शाहरुख शरीफा कुरेशी, अकील बाबू कुरेशी, वाहिद बाबू खान ,आलम मुस्कान शेख, नितीन उचाप्पा गायकवाड, अझीम कुरेशी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 325, 3 (5) व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 5(c),9(a),9(b) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अहिरेश्वर जगन्नाथ जगताप(रा. वरवंड, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास शहरातील खाटीक गल्ली परिसरात घडली. फिर्यादी यांना माहिती मिळाली की, 4 ते 5 जणांनी खाटीक गल्ली परिसरात गोमांस विक्रीकरिता गोवंश ची कत्तल केली आहे. फिर्यादी यांनी सदरची माहिती दौंड पोलिसांना कळविली त्यावेळी दौंडचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुलथे, पोलीस हवालदार बनकर, देवकाते, पोलीस शिपाई महादेव जाधव यांचे पथक खाटीक गल्ली परिसरात पोहोचले तेव्हा सर्व आरोपी गोमांस तोडत होते.
पोलीस पथकाची चाहूल लागताच सर्व आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी आसिफ कुरेशी, शाहरुख कुरेशी, अकील कुरेशी, वाहिद खान यांना जागीच पकडले. परंतु आलम शेख, नितीन गायकवाड, अजीम कुरेशी हे मात्र तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस पथकाने पंचांसमक्ष बाराशे किलो गोमांस तसेच इतर साहित्य असा एकूण 2 लाख 17 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निखिल जाधव करीत आहेत.